मॅनचेस्टर - विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या 'धुलाई'ची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि संघाला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले आहेत. शोएबने पाकिस्तानचा कर्णधार सरफराजला 'बिनडोक' कर्णधार म्हटले आहे.
CRICKET WC: सरफराज बिनडोक कर्णधार... जेव्हा शोएब खेळाडूंच्या कर्माबद्दल बोलतो - india vs pakistan
शोएब अख्तरने पाकिस्तानचा कर्णधार सरफराजला 'बिनडोक' कर्णधार म्हटले आहे.
शोएब म्हणाला, " चँपियन ट्रॉफीमध्ये मागच्या वेळेस भारताने ज्या चूका केल्या त्याची पुनरावृत्ती पाकिस्तानच्या संघाने या सामन्यात केली. पाकिस्तानी खेळाडू आपल्या कर्माचे बळी पडले. मला कळत नाही की सरफराज एवढा बिनडोक कर्णधार कसा असू शकतो. त्याला एवढेही समजले नाही की, आपली ताकद गोलंदाजीमध्ये आहे. पण तुम्ही काय केले, तर सामना जिंकू नये यासाठी प्रयत्न केले. नाणेफेक जिंकून एक चांगली संधी मिळाली होती. पण डोकच वापरले नाही. हॅट्स ऑफ टू हिंदुस्तान."
रोहित शर्माच्या १४० धावांच्या शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान दिले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण पाकिस्तानला भारताचे हे आव्हान पेलवले नाही.