मँचेस्टर - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान रंगलेल्या विश्वकरंक क्रिकेट स्पर्धेतील सेमीफायनमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर भारताची फलंदाजीची, अशी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असे कुणाला वाटलेदेखील नव्हते. भारताचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न भंगले असले तरी आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रवींद्र जडेजाची खेळी अनेकांच्या स्मरणात राहिल.
लोकेश राहुल, रोहित शर्मा ही तुफान फॉर्मात असलेली सलामी जोडी, कर्णधार विराट कोहली, दिनेश कार्तिक हे महत्त्वाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने भारतीय संघाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. रिषभ पंत (३२) आणि हार्दिक पांड्या (३२) यांनी काही काळ मैदानावर संयमी खेळी करत भारताला पडझडीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ६ बाद ९२ अशी भारताची बिकट अवस्था झाली होती. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी एकेरी-दुहेरी धावा करून जम बसवण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी त्याच्या साथीला आलेल्या रवींद्र जडेजाने आक्रमक खेळी करत चाहत्यांना दिलासा दिला. एकिकडे धोनी 'एकेरी-दुहेरी'चा फंडा वापरत होता तर दुसरीकडे जडेजा फटकेबाजी करत होता. दडपण जुगारून त्याने ३९ चेंडुत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, अखेर ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत ७७ धावांची खेळी करणारा जडेजा ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर लाँन्ग ऑनला फटका मारताना झेलबाद झाला. कर्णधार केन विल्यमसनने त्याचा झेल पकडला. त्यामुळे मैदानावर अक्षरश: सन्नाटा पसरला.