नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये रोज अनेक विक्रम घडत असतात. असाच एक विशेष विक्रम मंगळवारी महिला क्रिकेटमध्ये नोंदवला गेला. चंदीगडकडून खेळणारी वेगवान गोलंदाज काशवी गौतमने एकदिवसीय सामन्यात दहा बळी घेण्याची किमया करून दाखवली. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात काशवीने ४.५ षटकांत १२ धावा देत ही कामगिरी नोंदवली.
हेही वाचा -न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी काशवी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. बीसीसीआयच्या १९ वर्षांखील स्पर्धेत चंदीगडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १८६ धावा केल्या होत्या. कर्णधार काशवीने फलंदाजी करताना ४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना अरूणाचलचा संघ अवघ्या २५ धावांत ढेपाळला.
काशवीने आतापर्यंत तीन सामन्यांत १८ बळी घेतले आहेत. यापूर्वी तिने जम्मू-काश्मीरविरुद्ध ७ बळी घेतले होते. नेपाळचा डावखुरा वेगवान गोलंदाज मेहबूब आलमने २००८ आयसीसीच्या विश्वचषक विभाग-5 सामन्यात मोझांबिक विरुद्ध १२ धावा देत १० गडी बाद केले होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील डावात अशी करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. कसोटीत इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळेने १० बळी टिपले आहेत.