लंडन -भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने तो माघार घेत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आता धवननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर आभार मानत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडलेला धवन म्हणतो, 'Show Must Go On'
शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेबाहेर पडल्यानंतर धवनने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, मी विश्वकरंडक स्पर्धेचा आता भाग असणार नाही. दुर्देवाने, अंगठ्याची दुखापत वेळेवर बरी होऊ शकणार नाही. तरीही, शो मस्ट गो ऑन'. असे, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिले आहे.
लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे धवनच्या जागेवर आता पंतची भारतीय संघात वर्णी लागणार आहे.