ओव्हल - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बंगाली टायगर्स आणि ब्लॅक कॅप्स यांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. बांगलादेशने आफ्रिकेवर धक्कादायक मात करत स्पर्धेतल्या पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसमोर ३३१ धावांचे आव्हान ठेवले होते. बांगलादेशने सामन्यात सांघिक खेळ करत तुलनेले बलाढ्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा २१ धावांनी पराभव केला. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजयाचे सातत्य ठेवण्याचा बांगलादेशचा मानस असेच. आजचा सामना सायंकाळी ६ वाजता सुरू होईल.
तर दुसरीकडे विश्वकरंडकात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेचा धुव्वा उडवत १० विकेट राखून विजय मिळवला. कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत श्रीलंकेच्या पूर्ण संघाला १३६ धावांमध्ये गारद केले. त्यामुळे या लढतीत विजयी पताका फडकावून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.