मुंबई- भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर महाराष्ट्र पोलिसांचा एक व्हिडिओ शेअर केला आहेत. यात पोलीस एका वृद्धाला जेवण खाऊ घालत आहे.
युवराजने व्हिडिओसोबत म्हटलं आहे की, 'पोलिसांनी दाखवलेली माणूसकी पाहून आनंद झाला. कठीण काळात स्वत:चा डब्बा भुकेल्याला खाऊ घालणे, या दयाळूपणाच्या कृत्याने त्यांच्याप्रती मनात आदर वाढला'
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका महाराष्ट्रातील कुठला आहे ही माहितीसमोर आलेली नाही. पण व्हिडिओमध्ये दिसत असलेले पोलीस कर्मचारी मराठीमध्ये बोलत आहेत. यातील एक पोलीस व्हिडिओसाठी नाही तर चार दिवसांपासून भुकेला आहे, असे म्हणत आहे.
युवराज याआधी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला पाठिंबा दिल्याने ट्रोल झाला होता. युवराज आणि हरभजन यांनी आफ्रिदीच्या कामाला पाठिंबा देत त्याला मदतीचे आवाहन केले होते. पण ही गोष्ट भारतीय नेटकऱ्यांना आवडली नाही. तेव्हा त्यांनी दोघांना ट्रोल केले.
यानंतर युवीने, मला हे कळत नाही की मी जो मॅसेज केला होता, तो गरजूंना मदत मिळावी यासाठी होता. त्याला चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे. माझा हेतू कोणाच्या भावना दुखवायचा नव्हता. कोरोनामुळे पीडित असलेल्या गरजूंना मदत मिळो, हाच हेतू माझा होता. मी एक भारतीय आहे आणि मी नेहमी मानवतेसाठी उभा राहीन, असे म्हणत त्याने ट्रोलर्सचा समाचार घेतला होता.
हेही वाचा -रोहितने मोदींना पाठिंबा देत केले चाहत्यांना आवाहन
हेही वाचा -धोनीने आजच्याच दिवशी पाकला धूतलं होतं, 'ती' खेळी आजही चाहत्यांच्या आठवणीत