नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेचा उपांत्य सामना धोनीने ठरवून हरला असल्याची गंभीर टीका युवराज सिंह यांचे वडिल भारताचे माजी खेळाडू योगराज सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. योगराज सिंह यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना हा आरोप केला आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह याचे वडील योगराज यांनी धोनीवर अनेक वेळा सातत्याने 'जहरी' शब्दात टीका केली आहे. युवराजची कारकीर्द संपवण्यात धोनीचा हात असल्याचे आरोपही योगराज यांनी अनेकवेळा केला आहे. आता तर त्यांनी, विश्वकरंडकाचा उपांत्य सामना धोनीने ठरवून हरल्याचा गंभीर आरोप केला आहे.
'न्यूझीलंड संघाने दिलेले लक्ष्य धोनी सहज पार शकत होता. मात्र, त्याला ते करण्याची इच्छा नव्हती. त्याच्याशिवाय कोणताही भारतीय कर्णधार विश्वकरंडक जिंकावा असे धोनीला वाटत नाही. त्यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याचे योगराज म्हणाले.
न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात धोनी धावबाद झाला तो क्षण.. धोनी आणि जडेजाची जोडी मैदानात होती. या जोडीने शंभर धावांची भागिदारी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. तेव्हा धोनी स्वतः अनुभवी खेळाडू असताना त्याने जडेजाला फटकेबाजी करायला सांगितली. अशा स्थितीत युवराजने कधीच कोणत्या ज्यूनिअर खेळाडूला फटकेबाजी करण्यास सांगितले नाही. तो स्वतःह आक्रमक फटकेबाजी करत असे, असे योगराज म्हणाले.
दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने केलेल्या अनेक संथ खेळींवरुन तो टीकेचा धनी बनला आहे.