शारजाह - युएईत बुधवारपासून सुरू झालेल्या महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मिताली राजच्या वेलॉसिटी संघाने गतविजेत्या हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज संघाचा ५ गडी राखून पराभव केला. सुपरनोव्हाजने विजयासाठी १२७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेलॉसिटी संघाकडून सुषमा वर्माने ३४ तर सुने लूसने नाबाद ३७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
सुपरनोव्हाजची कामगिरी
सुपरनोव्हाजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चमारी अट्टापट्टु आणि प्रिया पुनिया या जोडीने आश्वासक सुरुवात केली. मात्र प्रिया पुनिया ११ धावा काढून बाद झाल्यानंतर नोव्हाजच्या डावाला गळती लागली. जेमिमा रॉड्रिग्ज, एकता बिश्त स्वस्तात बाद झाल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अट्टापट्टु यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मैदानात जम बसलेल्या अट्टापट्टुला (४४) जहानरा आलमने बाद केले. यानंतर हरमनप्रीतही ठराविक अंतराने माघारी परतली. अखेर सुपरनोव्हाजच्या संघाला १२६ धावांपर्यंत मजल मारता आली. वेलॉसिटीकडून एकता बिश्तने ३ तर जहानरा आलम आणि लेग कासपरेकने प्रत्येकी २-२ बळी घेतले.
वेलॉसिटीची विजयी खेळी
प्रत्युत्तरादाखल वेलॉसिटीच्या संघाची सुरुवात खराब झाली. अयाबोंगा खाकाने डॅनी वॅटला शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. पाठोपाठ 'लेडी सेहवाग' अशी ओळख असलेली शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राजही ठराविक अंतराने माघारी परतल्या. यानंतर वेदा कृष्णमुर्ती आणि सुषमा वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी करत डाव सावरला. राधा यादवने वेदाला (२९) बाद करत ही जोडी फोडली. यानंतर मैदानावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सुने लूसने सुषमा वर्माला साथ देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.