मुंबई- कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब कामगार आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सद्य घडीची परिस्थिती पाहून मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खान याने यंदा ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो ईद साजरी न करता मजुरांना मदत करणार आहे.
कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्या मजुरांनी काम नसल्याने आपले गाव गाठण्यास सुरूवात केली आहे. ते जमेल त्या मार्गाने आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मजूरांना रस्त्यात अनेक जण मदत करत आहेत आणि त्यात मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खान याचाही समावेश आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा हा खेळाडू मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो तेथे येणाऱ्या मजूरांना जेवण वाटप करत असताना दिसून आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आता या मजूरांना आणखी मदत करता यावी, यासाठी सर्फराजने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, 'यंदा आम्ही ईद साजरी करणार नाही. ईदसाठी नवीन कपडे आणि वस्तू खरेदी करण्यासाठी, जमवलेले पैसे आम्ही मजुरांना मदत करण्यासाठी खर्च करायचे, असे ठरवले आहे.'