मुंबई - भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकानंतर क्रिकेटपासून लांब आहे. तो आयपीएल २०२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. पण, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आयपीएलवर अनिश्चिततेचे सावट आहे. यामुळे धोनीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन लांबणीवर पडले. अशात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफरने धोनी जर फिट असेल तर तो टीम इंडियासाठी हिट आहे, असे म्हटले आहे.
धोनीची कारकिर्द आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याआधी केलं आहे. पण, सध्या कोरोनामुळे आयपीएलवर टांगती तलवार आहे. वसीम जाफरने धोनीच्या विषयावर ट्विट करुन आपले मत मांडले आहे.
जाफर म्हणतो की, 'जर धोनी तंदुरुस्त असेल आणि चांगल्या लयीत असेल तर मधल्या फळीत त्याच्यासारखा महत्वाचा खेळाडू दुसरा कोणी नाही. याशिवाय तो यष्ट्यांमागे सर्वोत्तम आहे. तसेच धोनीमुळे केएल राहुलवर यष्टीरक्षण करण्याची जबाबदारी येणार नाही. भारतीय संघाला जर डावखुरा फलंदाज हवा असेल तर पंतला केवळ फलंदाज म्हणून खेळवता येऊ शकतं.'