नवी दिल्ली -माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे कौतुक केले आहे. लक्ष्मणने वीरेंद्र सेहवागचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लक्ष्मणचे कौतुक केले.
''उच्च गुणवत्तेच्या वेगवान गोलंदाजीसमोर त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची वीरेंद्र सेहवागने खिल्ली उडवली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक सलामीवीरांमध्ये आपले स्थान पक्के केले. सेहवागचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता इतरांवर परिणाम करणारी होती'', असे लक्ष्मणने म्हटले. यापूर्वी, लक्ष्मणने अनिल कुंबळे, सौरव गांगुली, जवागल श्रीनाथ या माजी क्रिकेटपटूंचेही कौतुक केले आहे.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सेहवाग हा सर्वात धोकादायक सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जात होता. त्याने भारतासाठी 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले. त्यामध्ये त्याने अनुक्रमे 8586, 8273 आणि 394 धावा केल्या. 41 वर्षीय सेहवाग भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी, सेहवागने कोरोनाव्हायरसच्या या कठीण काळात प्रवासी मजुरांना घरगुती जेवण दिले. त्याच्या या कृतीमुळे सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सेहवागने स्वत: चा आणि आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो लोकांसाठी अन्न पॅक करताना दिसून आला. त्याने लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचा फोटोही शेअर केला होता.