नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची परत वर्णी लागली. आता इतर कोचिंग स्टाफचीही काही दिवसांत नियुक्ती केली जाणार आहे. यादरम्यान, भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारताच्या एका माजी कर्णधाराला निवड समितीचे अध्यक्ष केले पाहिजे असे म्हटले आहे.
सेहवागने एका कार्यक्रमावेळी आपली इच्छा बोलून दाखवली. त्याने अनिल कुंबळे याचे नाव पुढे केले. तो म्हणाला, 'कुंबळे जेव्हा कर्णधार होता तेव्हा तो एकदा माझ्या रुममध्ये आला आणि म्हणाला, तू जसा खेळतोस तसाच खेळत राहा. तुला दोन मालिकेपर्यंत कोणीही संघातून काढणार नाही. या बोलण्याने मला आत्मविश्वास मिळाला. मला वाटते की कुंबळे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे.'