मुंबई- भारताचा स्फोटक क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, एकदा मैदानावर थांबला की तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असे. त्याच्या करिअरमध्ये त्याने अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. कसोटीत दोन वेळा त्रिशतक करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध हा कारनामा केला आहे. सेहवागने त्यांच्या फलंदाजीची प्रेरणा रामायणमधील अंगद ही व्यक्तीरेखा असल्याचे म्हटले आहे.
संपूर्ण देश कोरनामुळे २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात घरी असलेल्या लोकांसाठी दुरदर्शनवर रामायण दाखवले जात आहे. रामायण मालिकेचे २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा प्रसारण करण्यात येत आहे. रविवारी रामायणचा भाग झाल्यानंतर यातील एका दृश्याचा फोटो सेहवागने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
बालीचा पुत्र अंगद जेव्हा रावणाकडे जाऊन, कोणी पाय हलवू दाखवला तर श्री रामाचा पराभव झाला असे समजावे हे आव्हान देतो. तेव्हा रावणाच्या सभेतील कोणत्याच मंत्र्याला ते शक्य होत नाही. जेव्हा खुद्द रावण अंगदचे पाय हलवण्यासाठी येतो तेव्हा अंगद पाय बाजूला करतो आणि रावणाला श्री रामाचे पाय धरण्यास सांगतो. रामच तुम्हाला माफ करतील, तो असे सांगतो. सेहवागने या घटनेचा फोटो शेअर करत क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी, अंगद ही व्यक्तीरेखा आपली प्रेरणा असल्याचे म्हटले आहे.