नवी दिल्ली -दिल्ली कॅपिटल्सने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला सहज नमवल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांना संथ खेळ केला.
संघाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने १० तर शेन वॉटसन १४ धावांवर माघारी परतला. फाफ डु प्लेसिसने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड ५ धावा करू शकला, तर केदार जाधवने २६ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनी या सामन्यात सहाव्या क्रमांकावर आला. त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. धोनी पुन्हा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने त्याच्यावर पुन्हा टीका झाली.
दिल्लीविरुद्धच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग चेन्नईने कसोटी सामन्यासारखा केला, असे सेहवागने सांगितले. तो इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला, ''दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईची सुरुवात फार खराब झाली नव्हती. पण सामन्यात चेन्नईचे खेळाडू सातत्याने दुसऱ्या गिअरवर असल्याचे दिसत होते. मुरली विजयला आपण टी-२० क्रिकेट खेळतोय हे कदाचित माहित नसावे. शेन वॉटसन हा एका जुन्या इंजिनासारखा खेळतोय. त्याला सुरु व्हायला वेळ लागतो आणि तो लवकरच बंद पडतो. आपण कसोटी नव्हे तर टी-२० खेळतोय, हे फाफ डु प्लेसिस मैदानात आल्यानंतर तो इतर खेळाडूंना सांगतोय. आता धोनीऐवजी भारतात बुलेट ट्रेन येईल. पण धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार नाही.''
राजस्थानविरूद्धच्या सामन्यातही धोनी सातव्या क्रमांकावर आला. शेवटच्या षटकात त्याने तीन षटकार खेचले असले तरी, राजस्थानने सामन्यात आपला विजय निश्चित केला होता.