हॅमिल्टन- पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४७ धावा, धावफलकावर लावूनही भारतीय संघाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर, टॉम लाथम आणि हेन्री निकोलस या त्रिमूर्तीने भारताचा तोंडचा घास पळवला. भारतीय संघ हा सामना जिंकू शकला असता. मात्र, तरीही का पराभूत झाला, याचे विश्लेषण खुद्द भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले आहे.
पराभवानंतर विराट म्हणाला की, 'आम्ही धावफलकावर मोठी धावसंख्या उभारली होती. ती पुरेशी होती. पण रॉस टेलर आणि टॉम लाथम यांनी चांगली फलंदाजी करत सामना आमच्याकडून हिरावून घेतला. न्यूझीलंडने या सामन्यात चांगली कामगिरी केली. या विजयाचे श्रेय टेलर आणि लाथम यांना जाते.'
सामना जिंकायची आम्हालाही अनेक संधी मिळाल्या. पण आम्ही त्या गमावल्या. या पराभवातून आम्हाला बरेच शिकण्यासारखे आहे. पण या पराभवानंतर नकारात्मकता येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. न्यूझीलंडने आमच्यापेक्षा चांगला खेळ करत हा सामना जिंकला. यापुढच्या सामन्यात त्यांच्यापेक्षा सरस खेळ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही विराट म्हणाला.