तिरुवनंतपुरम -सलामीवीर लेंडल सिमन्सने केलेल्या नाबाद ६७ धावांच्या खेळीमुळे विंडीजने भारतावर दुसऱ्या टी-२० सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह 'हम भी कुछ कम नही' असा इशारा भारताला देत मालिकेतील पहिल्या पराभवाचा बदला वेस्ट इंडीजने घेतला. मागच्या सामन्यात हिरो ठरलेला विराट या सामन्यात १९ धावांवर माघारी परतला असला तरी त्याने घेतलेल्या झेलची सर्वात जास्त चर्चा झाली.
हेही वाचा -पाक खेळाडूने ओढले स्वतःच्याच मंडळावर ताशेरे, म्हणाला, 'थट्टा बस करा!'
विराटला या सामन्यात अपेक्षितरित्या चांगली कामगिरी करता आली नसली तरी, त्याने क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त झेल घेतला. त्याचा हा सुपरमॅन झेल पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. भारताच्या रवींद्र जडेजाने टाकलेल्या 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिम्रॉन हेटमायरचा विराटने पळत जाऊन जबरदस्त झेल घेतला. हेटमायरला २३ धावांवर तंबूत परतावे लागले. पाहा विराटने घेतलेला झेल -
या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून शिवम दुबे (५४) आणि ऋषभ पंत (नाबाद ३३) या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. इतर फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताने १७१ धावांचे आव्हान वेस्ट इंडीजसमोर ठेवले.
या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने १-१ अशी बरोबरीत साधली आहे. मालिकेतील अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.