इंदूर - टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध टी-२० मालिका २-१ ने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून इंदूरच्या होळकर मैदानावर रंगणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी विराट इंदूरच्या रस्त्यांवर स्थानिक मुलांसोबत 'गली क्रिकेट' खेळताना दिसला. विराटचा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
विराट कोहली बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर आता तो कसोटी मालिकेव्दारे टीम इंडियात पुनरागमन करत आहे. पहिल्या सामन्याआधी विराट इंदूरच्या रस्त्यांवर स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, विराट फलंदाजी करताना दिसत आहे. यावेळी त्याने खूप मजा केली.
घडलं अस की, कसोटी सामन्याआधी विराट इंदूरच्या एका कॉलनीत शूटिंगसाठी आला होता. शूटिंगनंतर कोहली इथल्या मुलांसमवेत क्रिकेट खेळला. यादरम्यान त्याने आपल्या चाहत्यांसमवेत सेल्फीही घेतली. कोहलीला पाहण्यासाठी थोड्याच वेळात मोठी गर्दी जमली होती.