वेलिंग्टन- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. तो नेहमी आपली कामगिरीच्या सातत्यामुळे चर्चेत असतो. यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी विराटला सर्वोत्तम फलंदाज म्हणून पावती दिली आहे. आता खुद्द विराटने आपल्या निवृत्तीबाबत प्लॅन सांगितला. तो कधी निवृत्ती घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
विराटला निवृत्तीबाबत प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला की, 'मी माझ्या कारकिर्दीसाठी एक प्लॅन बनवला आहे. यापुढील तीन वर्षे मी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे. यासाठी सध्या तरी मी पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्वत:ला तयार करतो आहे. क्रिकेटच्या मैदानात आपण दमदार कामगिरी करत राहावी यासाठी मी सध्या केवळ पुढील तीन वर्षांचाच विचार करतो आहे. पण त्यानंतर मी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार की नाही, याबाबत आत्ताच सांगणं कठिण आहे. कारण क्रिकेटचे कार्यक्रम फारच व्यस्त झाले आहे.'
पुढे बोलताना विराट म्हणाला, 'वर्षातील जवळपास ३०० दिवस तरी मी क्रिकेटमध्ये असतो. काही वेळा सामने नसले तरी सराव करावा लागतो. सराव करताना तुम्हाला फिटनेस कायम ठेवावा लागतो. त्यामुळे आता तरी मी तीन वर्षे तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणार आहे, पण नंतर मात्र कदाचित मी वेगळा निर्णय घेऊ शकतो.'
दरम्यान विराटला न्यूझीलंड दौऱयातील एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. तसेच व्यस्त क्रिकेटचे कार्यक्रम यामुळे विराटने आपला निवृत्तीबाबत प्लॅन बनवल्याचे बोलले जात आहे.