चेन्नई - भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर पॅटर्निटी लिव्हवर भारतात परतला. त्यावेळी भारतीय संघ चार सामन्याच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर होता. विराट परतल्यानंतर संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे आली. तेव्हा अजिंक्यने कुशल नेतृत्व करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यादरम्यान, विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने ११ जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता विराटने तो कशाप्रकारने संघासोबत जोडला गेलेला होता, याचा खुलासा केला आहे.
मी रुग्णालयात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना मोबाईलवर पाहत होते. शार्दुल ठाकूर आणि वॉशिग्टन सुंदर ही जोडी फलंदाजी करत होती. तेव्हा अचानक डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवले, अशी आठवण विराटने सांगितली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळत होता. तेव्हा विराट, पत्नी अनुष्कासह रुग्णालयात होता.
बाप बनणे आणि भारतीय संघाचा विजय या दोन्हीची तुलना होऊ शकत नाही. बाप बनणे हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे आणि पुढे देखील राहिल, असे देखील विराट म्हणाला.