मुंबई - भारतीय संघ संकटात असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने रविंद्र जडेजासोबत महत्वपूर्ण भागिदारी करत वैयक्तिक शतक झळकावले. रहाणेच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाअखेर ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे पहिल्या डावात आतापर्यंत ८२ धावांची महत्वपूर्ण आघाडी झाली आहे. दरम्यान, रहाणेच्या शतकी खेळीवर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे. यात त्याने, आपल्या भारतीय संघासाठी आणखी एक चांगला दिवस, कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट. नक्कीच टॉप फलंदाजी जिंक्य असे, म्हटलं आहे.
अजिंक्य रहाणेने दुसऱ्या दिवसाअखेर २०० चेंडूचा सामना करत नाबाद १०४ धावा केल्या आहेत. यात १२ चौकारांचा समावेश आहे. रहाणेने जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागिदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. जडेजाने नाबाद ४० धावा करत रहाणेला चांगली साथ दिली.