पुणे - भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी पोहोचला आणि त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार म्हणून विराटचा हा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. २०० सामन्यात कर्णधारपद भूषवणारा विराट भारताचा तिसरा तर जगातील आठवा खेळाडू ठरला आहे.
विराटने २०१२-१३ साली वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलं. धोनी दुखापतग्रस्त झाल्याने, विराटला संघाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. यानंतर २०१४ साली महेंद्रसिंह धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. यामुळे विराटकडे कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. २०१७ ला धोनीने एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व सोडलं. तेव्हा विराटची वर्णी कर्णधारपदी लागली.
विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आशिया चषक जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत धूळ चारण्याची किमया साधली. याशिवाय विराटच्या नेतृत्वात भारताने २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आणि २०१९ च्या विश्व करंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.
विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने खेळललेल्या १९९ सामन्यात १२७ विजय मिळवले आहेत. तर ५५ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. यातील ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत. तर १० सामने ड्रॉ करण्यात आले.
२०० किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवणारे खेळाडू -
- महेंद्रसिंह धोनी (भारत) - ३३२ सामने
- रिकी पाँटिंग (आयसीसी / ऑस्ट्रेलिया) - ३२४ सामने
- स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) - ३०३ सामने
- ग्रीम स्मिथ (दक्षिण अफ्रीका / आईसीसी /आफ्रिका XI) - २८६ सामने
- एलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) - २७१ सामने
- अर्जुणा रणतुंगा (श्रीलंका) - २४९ सामने
- मोहम्मद अजहरुद्दीन (भारत) - २२१ सामने
- विराट कोहली (भारत) - २००* सामने