मुंबई -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे टाकत आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीने पहिले स्थान मिळवले आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे कोहलीने क्रमवारीत सुधारणा केली आहे.
हेही वाचा -Ind vs Wi : विराट हैदराबादला रवाना, वेस्ट इंडीजचा संघ सरावाला लागला
ताज्या क्रमवारीनुसार कर्णधार कोहली ९२८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर स्मिथ ९२३ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. अॅडलेड कसोटीतील खराब कामगिरीचा स्मिथला फटका बसला आहे. या कसोटीत त्याने ३६ धावा केल्या, तर ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला फक्त ४ धावा करता आल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत वॉर्नरने ४८९ धावा ठोकल्या. त्यामुळे वॉर्नरने पाचवे स्थान मिळवले आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे कसोटी क्रमवारीत एक स्थान खाली घसरत सहाव्या क्रमांकावर आला आहे. तर चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानी कायम आहे.