पुणे - विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतकाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. मागील १५ महिन्यात विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याने अखेरचे शतक २२ नोव्हेबर २०१९ मध्ये ठोकले होते. विराट सद्या सुसाट फॉर्मात आहे. त्याने जर एकदिवसीय मालिकेत देखील हा फॉर्म कायम राखत शतक झळकावले तर त्याला अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे.
- रिकी पाँटिंगने कर्णधारपदी असताना, ४१ शतकं झळकावली आहेत. हा विक्रम मोडण्याची विराटला संधी आहे. विराटने ४२ वे शतक पूर्ण केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक लगावणारा पहिला कर्णधार ठरेल.
- विराटला सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची मोडण्याची संधी आहे. भारतात सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे. सचिनने भारतात २० शतक पूर्ण केले आहेत. तर विराट सचिनपासून १ शतक दूर आहे.
- विराटने या मालिकेत शतक झळवल्यास हे त्याचे इंग्लंड विरुद्धचं चौथे शतक ठरेल. त्यासह तो युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी साधेल. युवराजने इंग्लंड विरुद्ध ४ शतक झळकावले आहेत. तर विराटच्या नावे इंग्लंड विरुद्ध ३ शतकांची नोंद आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराटने सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने पाच सामन्यात १४७.१३ च्या स्ट्राइक रेटने २३१ धावा केल्या. या कामगिरीमुळेच विराटला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.