नागपूर- विदर्भाच्या संघाने चांगली कामगिरी करताना सलग दुसऱ्यांदा रणजी स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. विदर्भाने अंतिम सामन्यात सौराष्ट्रला ७८ धावांनी पराभूत केले. कर्णधार फैज फजलच्या नेतृत्वात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. फैज सलग दुसऱ्यांदा रणजी जिंकणारा अकरावा कर्णधार ठरला आहे. सामन्यांतर फैज फजल ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया देताना म्हणाला, वर्षभराचे अथक परिश्रम आणि मेहनतीचे यश म्हणजे आजचा विजय आहे.
वर्षभराचे अथक परिश्रम, मेहनतीचे फळ मिळाले - कर्णधार फैज फजल
विदर्भाच्या संघाने चांगली कामगिरी करताना सलग दुसऱ्यांदा रणजी स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. विदर्भाने अंतिम सामन्यात सौराष्ट्रला ७८ धावांनी पराभूत केले. कर्णधार फैज फजलच्या नेतृत्वात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
फैज फजलची प्रतिक्रिया
विदर्भ संघाने गेल्यावर्षी चांगली कामगिरी करताना रणजी चषकावर नाव कोरले होते. यावर्षीही संघाने चांगली कामगिरी करताना रणजी करंडक विदर्भाकडेच कायम ठेवला आहे. या यशाबद्दल बोलताना कर्णधार फैज फजल म्हणाला, विदर्भ क्रिकेट संघाच्या प्रत्येक खेळाडूने वर्षभर अथक परिश्रम केले आहे. अंतिम सामन्याला शोभेल असा हा सामना होता. सामन्यात चढ-उतारांच्या परिस्थितीला खेळाडूंनी चांगल्याप्रकारे सामना केला. यामुळेच विजेतेपद पटकावता आले. पुढीलवर्षीही चांगली कामगिरी करताना स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रीक साजरी करण्यासाठी खेळू.
रणजी स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावणार फजल अकरावा कर्णधार ठरला आहे. याआधी महाराष्ट्राचे प्रोफेसर डीबी देवधर असा पराक्रम करणारे पहिले कर्णधार होते. त्यांनी १९४०-४१ साली महाराष्ट्र संघास रणजी किताब मिळवून दिला. मुंबईचे बापू नाडकर्णी यांनी सलग तीन वेळा १९६४, १९६५, १९६६ साली किताब जिंकून दिला होता. अजित वाडेकर हे मुंबईचे कर्णधार असताना दोनदा हा पराक्रम त्यांनी केला होता. वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९६९ आणि १९७० साली तर, त्यानंतर १९७२ आणि १९७३ साली रणजी करंडक जिंकून दिला, अशी कामगिरी करणारे ते एकमेव कर्णधार आहेत.