नागपूर - सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडकावर नाव कोरण्याची कामगिरी विदर्भच्या संघाने आज केली. या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम विदर्भाच्या संघाने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला चौथ्या दिवशी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या सीआरपीएफ जवानांना विदर्भ आणि शेष भारताच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. उभय संघातील खेळाडूंनी दंडावर काळ्या फिती लावून मैदानात उतरले आणि दहशतवादी कृत्याचा निषेध केला.
पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आले. हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार कर्णधार फैज फझल याने ही घोषणा केली आहे.