कराची- पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याला मिरगी (अपस्मार) आजार होता. त्याने या आजारावर उपचार घेण्यास नकार दिले, असा खळबळजनक दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी केला आहे. सेठी यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
नजम सेठी यांनी २०१३ ते २०१८ या काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि कार्यकारी समिती प्रमुख म्हणून काम पहिलं आहे. त्यांनी सांगितलं, की त्यांनी जेव्हा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांना पहिली समस्या उमरच्या रुपाने समोर आली.
सेठी यांनी एका वाहिनीला बोलताना सांगितलं, 'आमच्याकडे एक मेडिकल रिपोर्ट आला होता. त्यात उमरला मिरगीचा आजार असल्याचे स्पष्ट होतं. याच कारणामुळे आम्ही त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघारी बोलवलं होतं. मी जेव्हा उमरला भेटलो. तेव्हा याविषयी हा गंभीर आजार असल्याचे त्याला सांगितले. तसेच विश्रांती घेऊन यावर योग्य उपचार घे, असा सल्लाही दिला. पण त्याने हा सल्ला विचारात घेतला नाही.'