मुंबई - ऑस्ट्रेलियाने भारताला भारतात टी-२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेत पराभूत करुन मालिकेवर कब्जा केला. एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असतानाही शेवटचे सलग ३ सामने भारताने गमावले. विश्वचषकापूर्वी भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडूंनी संधी दिली गेली. मात्र, अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याने क्रिकेट समीक्षक आणि चाहते निवड समितीवर नाराज आहेत.
दिल्ली येथे पाचव्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला संघात स्थान द्या या मागणीसाठी नेटिझन्सने जोर धरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मधल्या फळीत विजय शंकर, रवींद्र जाडेजा, अंबाती रायुडू, लोकेश राहुल यांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. विश्वचषकात अजिंक्य रहाणेला संधी देण्याची मागणी नेटिझन्स करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी अजिंक्य रहाणेवर त्याच्यावर अन्याय होत असल्याची आरोप केला होता. वेंगसरकर यांच्या मते, अजिंक्य उत्तम फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यावर अन्याय करण्याऐवजी त्याला संघात स्थान द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.