मुंबई- ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी तब्बल २१ चेंडू नो बॉल टाकले. मात्र, याकडे पंचानी लक्ष दिले नाही. या कारणाने मैदानातील पंचाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सुरू होणाऱ्या मालिकेत पंचांच्या बाबतीत मोठा बदल करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉलवर लक्ष ठेवण्याचे काम मैदानातील पंच करत असत. मात्र आता नो बॉलवर लक्ष ठेवण्याचे काम तिसरे पंच (Tv Umpire) करणार आहेत. या संदर्भातचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ठेवला होता. त्या प्रस्तावाची चाचपणी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेत करण्यात येणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात ६ डिसेंबरपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेनंतर उभय संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोनही मालिकेत नो बॉलचा निर्णय तिसरे पंच देतील. ही सुरूवात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे.