मुंबई -भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना ४ गडी राखून जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारतीय संघाने दिलेले ३४८ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. रॉस टेलरने नाबाद १०९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पराभवानंतर भारतीय संघाच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारे पहिले पाच संघ कोणते आहेत. ते वाचा...
न्यूझीलंड -
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघाच्या यादीत न्यूझीलंडचा पाचवा क्रमांक लागतो. न्यूझीलंडने आपला पहिला एकदिवसीय सामना ११ फेब्रुवारी १९७३ मध्ये खेळला होता. आतापर्यंत न्यूझीलंडने ७६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी न्यूझीलंडने ३४९ सामने जिंकले तर ३७३ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
वेस्ट इंडीज -
दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडीज या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विंडीजने आपला पहिला सामना ४ सप्टेंबर १९७३ ला खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत विडींजने ८१९ सामने खेळले आहेत. यात ४०१ विजय तर ३७८ पराभवाचा समावेश आहे.