लंडन -वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंनी इंग्लंड दौर्यावर जाण्यास नकार दिला आहे. स्थानिक माध्यमाच्या वृत्तामुळे ही माहिती समोर आली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघ जुलैमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. नकार दिलेल्या खेळाडूंमध्ये ड्वेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि किमो पॉल यांची नावे आहेत.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या कसोटी सामन्यांसाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. जर सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिका खेळली जाईल. लॉकडाऊननंतर खेळवली जाणारी ही पहिली मालिका ठरु शकते.
कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धा, मालिका बंद आहेत. आयसीसीला यामुळे मोठे नुकसान होत असून आयसीसीने हे नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना आता हळुहळु यश येताना दिसत आहे, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 8 जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार असून हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत.
वेस्ट इंडीजचा संघ तीन कसोटी सामने खेळण्यासाठी 9 जूनला इंग्लंडमध्ये येणार आहे. यानंतर पुढचे काही दिवस विंडीजचा संघ स्वतःला क्वारंटाइन करुन सरावाला सुरुवात करेल, अशी माहिती इंग्लंड बोर्डाकडून देण्यात आली.