मेलबर्न -अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभवाची धूळ चारली आणि चार सामन्याचा मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनावर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री खुश आहेत. भारताचा हा विजय कसोटी मालिका इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकमधील एक विजय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
अॅडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यानंतर संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. यावर शास्त्री यांनी, हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा कमबॅकमधील एक विजय आहे, असे सांगितले.
भारताच्या विजयाची कोणी कल्पना देखील केली नव्हती
सामना संपल्यानंतर बोलताना शास्त्री म्हणाले की, माझ्या विचारानुसार हा विजय एक उदाहरण म्हणून पहिले जाईल. निश्चितपणे हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकमधील एक सामना आहे. तीन दिवसाआधी एक संघ जो ३६ धावांत ऑलआऊट झाला होता. तो संघ पुनरागमन करत विजय मिळवेल, याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. पण आमच्या खेळाडूंनी जिद्दीने पुनरागमन करत विजय साकारला.