मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना परत एकदा उधाण आलं आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या 'निवृत्तीचं' रहस्य सांगितलं. 'धोनीचा पुढील निर्णय यंदाच्या आयपीएलवर अवलंबुन असेल. त्यामुळे तेवढी वाट पाहा', असं शास्त्रींनी म्हटलं आहे.
हेही वाचा -फलंदाजांनो सावधान...बुमराहने मोडलाय स्टम्प!
धोनीच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची उत्सुकता लागून राहिली आहे. जवळपास चार महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून लांब आहे. त्याने अखेरचा सामना इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला होता. त्याच्या परतीविषयी शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली.
'आगामी आयपीएलमध्ये तो कसा खेळतो यावर सर्व अवलंबून आहे. विकेटकीपिंगमध्ये इतर खेळाडू काय करत आहेत आणि धोनीच्या तुलनेत त्यांचा फॉर्म कसा आहे हे दिसून येईल. टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयपीएल ही शेवटची मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे या आयपीएलची वाट पाहा. देशातील सर्वोत्तम १७ खेळाडू कोण आहेत हे या स्पर्धेतून समोर येईल', असे शास्त्रींनी म्हटले आहे.
अद्याप धोनीने पुनरागमनाविषयी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, धोनी टीम इंडियाकडून नव्हे तर आशियाई इलेव्हन संघाकडून खेळताना पाहायला मिळू शकतो. पुढील वर्षी १८ मार्च ते २१ मार्च २०२० दरम्यान, विश्व इलेव्हन आणि आशियाई इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे धोनीसह ७ भारतीय खेळाडूंची मागणी केली आहे.