नवी दिल्ली -२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेचा विजेता संघ इंग्लंडने आफ्रिकेविरूद्धच्या कसोटीत मोठा कारनामा नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये ५ लाख धावा करणारा इंग्लड हा पहिला संघ ठरला आहे. १०२२व्या कसोटी सामन्यात इंग्लंडने हा विश्वविक्रम रचला.
हेही वाचा -न्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाने रचला खास विक्रम!
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने २५ वी धाव घेताच या मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. शिवाय, विदेशात ५०० वा कसोटी सामना खेळणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे १६ जानेवारीला आफ्रिकेविरूद्ध इंग्लंडने ५०० वा सामना खेळला होता.
त्याचबरोबर भारतीय संघ सर्वाधिक धावा काढण्याच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत ५४० कसोटी सामन्यांमध्ये २,७३,५१८ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया ४,३२,७०६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ८३० कसोटी सामन्यात या धावा केल्या आहेत.