मुंबई- खेळासाठी फिटनेस अत्यंत महत्त्वाचा असतो. यासाठी खेळाडू खूप मेहनत घेत असतात. पण सद्या लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू आपापल्या घरात आहे. अशात त्यांना फिटनेस राखणे कठिण बनलं आहे. पण, काही खेळाडू घरामध्येच व्यायाम करताना पाहायला मिळाले. याचे व्हिडिओ त्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. दरम्यान, आता भारतीय क्रिकेट संघाचे ट्रेनर लॉकडाऊनमध्येदेखील आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर तीक्ष्ण नजर ठेवून असल्याचे समोर आले आहे.
क्रिकेट संघातील खेळाडूंना फिटनेसचा चार्ट देण्यात आला आहे आणि ट्रेनर निक वेब तसेच फिजियो नितीन पटेल 'अॅथिलिट्स मॉनिटरिंग सिस्टीम' या अॅपद्वारे खेळाडूंच्या फिटनेसवर बारीक नजर ठेवून आहेत. याविषयी संघ व्यवस्थापनातील सूत्राने सांगितले की, 'करारबद्ध खेळाडूंच्या प्रगतीबरोबरच ज्या विभागात सुधारणांची आवश्यकता आहे, त्यावर निक आणि नितीन लक्ष देत आहेत. खेळाडूंचा डाटा अॅपवर आल्यानंतर निक आणि नितीन ते तपासतात आणि प्रत्येक दिवशी ते खेळाडूंची प्रगती तपासत आहेत.'