मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील व्यवहारासह क्रीडाविश्वही ठप्प झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक स्पर्धा रद्द तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडू आपल्या घरात कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. पण, अशात एक खेळाडू असा आहे की जो कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी थेट रस्त्यावर उतरला आहे.
पहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा हिरो. तोच तो ज्याने अंतिम षटक टाकताना पाकिस्तानच्या मिसबाह उल हकला श्रीसंतकडे झेल देण्यासाठी भाग पाडलं आणि भारताला पहिला टी-२० विश्वकरंडक जिंकून दिला. होय, आपण बोलतोय जोगिंदर शर्माबद्दल.
जोगिंदर सध्या हरियाणा पोलीस दलामध्ये पोलीस उपाधिक्षक पदावर आहे. देशात कोरोनाचा धोका असतानाही, रस्त्यावर फिरणाऱ्यांना तो चांगलाच चोप देत आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे १९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउन केलं जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
जोगिंदरने, आम्हाला सहकार्य करा. आपण सगळे मिळून या कोरोनाचा नायनाट करु. बाहेर पडू नका, असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
हेही वाचा -Corona Virus : BCCI म्हणते.. 'घरीच थांबा; आमची करडी नजर आहे'
हेही वाचा -COVID-१९ : मोदींच्या लॉकडाऊन निर्णयाला क्रिकेट विश्वातून समर्थन, वाचा कोण काय म्हणाले...