मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहितसोबत सलामीला येत नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याच्या आणि रोहितच्या खेळीच्या जोरावर भारताला २२४ धावांचा डोंगर उभारता आला. सामना संपल्यानंतर विराटने आपण यापुढे देखील सलामीला फलंदाजीला येऊ, असे म्हटलं आहे. सलामी विषयावरुन भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
जहीर एका क्रीडा संकेत स्थळाशी बोलताना म्हणाला की, 'विराट सलामीला येऊ शकतो. हे संभव कसे झाले? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण संघात सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू आहे. सूर्यकुमारने दाखवलं आहे की, तो तिसऱ्या जागेवर खेळू शकतो. यामुळेच विराटने स्वत:ला सलीमीसाठी प्रमोट करण्याचा निर्णय घेतला. श्रेयसला खालच्या फळीत फलंदाजीसाठी ठेवण्यात आले आहे. यामुळेच देखील विराटने सलामीला उतरण्याचा विचार केला असेल.'
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराटने सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने पाच सामन्यात १४७.१३ च्या स्ट्राइक रेटने २३१ धावा केल्या. या कामगिरीमुळेच विराटला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.