मुंबई - सुरेश रैना पाठोपाठ हरभजन सिंगने आयपीएल २०२० स्पर्धेतून माघार घेतल्याने, चेन्नई सुपर किंग्जचा संघ अडचणीत आला आहे. अशात भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूने रैनाबद्दल मत व्यक्त केले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी, रैना सीएसकेमध्ये पुनरागमन करू शकतो, असे म्हटलं आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना दीपदास गुप्ता म्हणाले की, 'सुरेश रैना सीएसकेमध्ये पुनरागमन करेल, असे मला वाटते. क्वारंटाइनच्या नियमामुळे कदाचित त्याला पहिले काही सामने खेळता येणार नाही. पण तो नंतर संघात पुनरागमन करेल. त्यामुळेच बहुधा सीएसकेने अद्याप रैनाच्या ऐवजी संघात कोणत्याही खेळाडूला जागा दिलेली नाही.'
दरम्यान, सीएसकेने अद्याप सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या जागेवर बदली खेळाडूंची घोषणा केलेली नाही. यामुळे रैनाच्या परतीची आशा वाढली आहे. जर असे घडल्यास, सीएसकेच्या संघाला अधिक बळकटी मिळणार आहे.