अहमदाबाद - भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आजच्या दिवशी १९७१ साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. आज कसोटी पदार्पणाला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बीसीसीआयने भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गावसकर यांचा सत्कार केला.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गावसकर यांचा सत्कार केला. या सत्काराचे फोटो बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना बीसीसीआयने, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या कसोटी क्रिकेट पदार्पणाला ५० वर्ष पूर्ण झाली, त्याचे हे सेलिब्रेशन आहे, असे म्हटलं आहे. बीसीसीआयसोबत शाह यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून गावसकर यांच्या सत्काराचे फोटो शेअर केले आहेत.