नवी दिल्ली -सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत स्मिथची स्वप्नवत वाटचाल सुरू आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८० धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या खेळीमुळे कांगारूंना दोनशे धावांचा टप्पा गाठता आला.
हेही वाचा -बुमराह म्हणतो, 'कसोटीत मला नेहमीच चांगले प्रदर्शन करायचे होते'
स्मिथने ९० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह आपले २७वे अर्धशतक लगावले. स्मिथचे हे अॅशेस मालिकेतील सलग १० वे अर्धशतक आहे. एका संघाविरुद्ध सर्वात जास्त अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आता स्मिथच्या नावावर झाला आहे. हा विक्रम करताना त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महाबली इंझमाम उल हकला मागे टाकले आहे. इंझमामने इंग्लंडविरुद्ध लागोपाठ ९ वेळा अर्धशतकी खेळी केली होती.
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमही स्मिथने आपल्या नावावर केला आहे. त्याने सहा खेळींमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने पाच खेळींमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यंदाच्या अॅशेस मालिकेत स्मिथने एक दुहेरी शतक, दोन शतके, आणि ३ अर्धशतके केली आहेत. त्याची धावांची सरासरी १४० पेक्षा जास्त राहिली आहे.
पाचव्या कसोटीत केलेल्या अर्धशतकासोबतच त्याने या मालिकेत ७०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. असे करताना त्याने एवर्टन वीक्स, सुनील गावस्कर आणि ब्रायन लारा यांची बरोबरी केली आहे. स्मिथने याआधीही अॅशेसमध्ये एकदा ७०० धावांचा टप्पा ओलांडला होता. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डॉन ब्रॅडमन यांनी हा पराक्रम पाचवेळा केला होता.