स्मिथ-वॉर्नरचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन
मार्च २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी झेलत असलेल्या या दोन्ही खेळाडूंवरील १ वर्षासाठीची बंदी २९ मार्चला संपणार आहे.
दुबई - चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी झेलत असलेले स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दुबईत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने या दोघांना दुबईत बोलवत एक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात स्मिथ आणि वॉर्नरचे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी प्रेमाने आलिंगन देत जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रेलियाने केलेले हे अनोखे स्वागत पाहून स्मिथ आणि वॉर्नर भावूक झाले होते.
'संघाने आमचे केलेले स्वागत हे भारावून टाकणारे होते. सहकाऱ्यांनी आमेचे केलेले स्वागत पाहून आम्हाला वाटतेय की, आम्ही या संघातून कधी बाहेर गेलोच नव्हतो', अशा भावना यावेळी दोन्ही खेळाडूंनी व्यक्त केल्या. भारताविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर आता आमचा संघ पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करेल, असा विश्वास माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी व्यक्त केला आहे. २२ मार्च ते ३१ मार्च या काळात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका दुबई येथे खेळण्यात येणार आहे.