लाहोर - सामनावीर आणि वैयक्तिक दुसरा सामना खेळत असलेल्या भानुका राजपक्षेच्या ७७ धावांच्या जोरावर श्रीलंका संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला हरवले. पाकला ३५ धावांनी पराभूत करत लंकेने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत लंकेने २-० ने आघाडी घेतली.
हेही वाचा -वनडेत फक्त ६ विकेट्स घेणारा 'हा' गोलंदाज बनला विश्वविजेत्या इंग्लंडचा प्रशिक्षक
गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लंकेने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यांनी सहा गडी गमावत १८२ धावा केल्या. भानुका राजपक्षेने चार चौकार आणि सहा षटकारांसह ७७ धावांची तुफानी खेळी केली. शेहान जयसूर्याने ३४ तर, दासुन शनाकाने नाबाद २७ धावा करत राजपक्षेला चांगली साथ दिली.पाकिस्तानकडून इमाद वसीम, वहाब रियाज आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवता आला.
लंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर आटोपला. त्यांनी ५२ धावांमध्ये पाच विकेट्स गमावले होते. वानिंदु हसरंगाने आपल्या एकाच षटकात अहमद शहजाद, कप्तान सर्फराज अहमद आणि उमर अकमल यांना बाद करत पाकला हादरा दिला. त्यानंतर आलेल्या इमाद वसीम (४७) आणि आसिफ अलीने (२९) सहाव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. लंकेकडून नुवान प्रदीपने चार, हसरंगाने तीन, इसुरू उदानाने दोन आणि कसुन रजिताने एक बळी घेतला.