महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SRH vs RR : तेवतिया-पराग जोडीचा हैदराबादवर 'हल्ला बोल', राजस्थानचा रोमांचक विजय - सनराइजर्स हैदराबाद वि राजस्थान रॉयल्स सामन्याचा निकाल

राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला.

SRH vs RR Live Score IPL 2020 Today's match Live Updates Dubai
SRH vs RR : तेवतिया-पराग जोडीचा हैदराबादवर 'हल्ला बोल', राजस्थानचा रॉयल विजय

By

Published : Oct 11, 2020, 2:56 PM IST

Updated : Oct 11, 2020, 7:57 PM IST

दुबई - राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने पाच गडी राखून बाजी मारली. तेवतिया आणि पराग यांनी सहाव्या विकेटसाठी ४७ चेंडूत नाबाद ८५ धावांची भागिदारी केली. शेवटच्या २ चेंडूत २ धावांची गरज असताना परागने खलीलला षटकार ठोकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हैदराबादच्या १५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरूवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर बेन स्टोक्स अवघ्या ५ धावा काढत माघारी परतला. त्याला खलील अहमदने बाद केले. यानंतर स्टिव्ह स्मिथ (५) आणि जोस बटलरही (१६) एका धावेच्या अंतराने बाद झाले. राजस्थानची अवस्था एकवेळ ४.१ षटकात ३ बाद २६ अशी झाली होती. तेव्हा रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, राशिद खानने त्यांचे मनसुबे उधळून लावले. राशिदने उथप्पाला पायचित करून तंबूत पाठवलं. उथप्पाने १८ धावा केल्या.

राशिदने आपल्या पुढील षटकात सेट फलंदाज संजू सॅमसनला बाद करत सामना हैदराबादच्या बाजूने फिरवला. सॅमसनला (२६) राशिदने बेअरस्टोकरवी झेलबाद केले. यानंतर रियान पराग आणि राहुल तेवतिया या जोडीने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत सहाव्या विकेटसाठी नाबाद ८५ धावांची भागिदारी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. तेवतियाने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ४५ धावा केल्या. तर परागने २६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४२ धावांची खेळी साकारली. राशिद आणि खलील यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राजस्थानचे गोलंदाज जोफ्रा आर्चर, श्रेयश गोपाल आणि कार्तिक त्यागी यांनी पावर प्लेमध्ये टिच्चून मारा केला. त्यांनी वॉर्नर आणि बेअरस्टोला फटकेबाजी करण्यासाठी मोकळीक दिली नाही. आर्चरच्या पहिल्याच षटकात वॉर्नर बाद होता होता वाचला. वॉर्नच्या बॅटची कड घेऊन यष्टीमागे गेलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात झेपावण्याआधी खाली पडला. यानंतर वॉर्नरने सावध पावित्रा घेतला. दुसरीकडे जॉनी बेअरस्टोलाही मुक्तपणे फटकेबाजी करता येत नव्हती. तो पाचव्या षटकात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारताना डिप स्क्वेअरला उभ्या असलेल्या संजू सॅमसनकडे झेल देऊन बसला. संजूने हवेत सूर घेत सुरेख झेल टिपला. बेअरस्टोने १६ धावा केल्या. यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडे या जोडीने हैदराबादला अर्धशतक गाठून दिले.

वॉर्नर-पांडे जोडीने खराब चेंडूला सीमारेषाबाहेर टोलावत धावा जमवल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० चेंडूत ७३ धावांची भागिदारी केली. ऑर्चरला मागे सरकून फटका मारण्याच्या नादात वॉर्नर बोल्ड झाला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. दुसरी बाजू पकडून मनीष पांडेने अर्धशतक झळकावले. त्याने ४४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारासह ५४ धावा केल्या. उनादकटच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात पांडे बाद झाला. त्याचा झेल तेवतियाने टिपला. यानंतर केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग यांनी हैदराबादला १५८ धावांची मजल मारून दिली. विल्यमसनने दोन षटकारासह नाबाद २२ धावा केल्या. तर गर्ग १५ धावांवर धावबाद झाला. राजस्थानकडून ऑर्चर, कार्तिक त्यागी आणि उनादकट यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

Last Updated : Oct 11, 2020, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details