नवी दिल्ली - ''जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा तो बाद व्हायचा. माझ्यावर बंदी नसती तर डिव्हिलियर्स '360' म्हणून ओळखला गेला नसता'', असे मत भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतने मांडले आहे. एका अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये श्रीशांतने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने सध्याच्या भारतीय संघाबद्दलही आपले विचार मांडले आहेत.
श्रीशांतने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे क्रिकेटचा डॉन म्हणून वर्णन केले आहे. श्रीशांत धोनीच्या उत्कृष्ट फिटनेसविषयी म्हणाला, ''धोनी फक्त 38 वर्षांचा आहे आणि त्याला देशासाठी खेळायला आवडते. त्याचे हे निवृत्तीचे वय नाही.''
धोनी स्टोक्सची कारकीर्द संपुष्टात आणू शकतो -
श्रीशांत धोनीच्या निवृत्तीबाबत बोलताना म्हणाला, ''माही भाई अजून खूप क्रिकेट खेळणार असून त्याला कोणाच्याही सल्ल्यांची गरज नाही. बेन स्टोक्सने धोनीबाबत उगाच काहीतरी बोलू नये. धोनीने मनात आणले तर स्टोक्सची कारकीर्द संपुष्टात आणू शकतो.'' बेन स्टोक्सने आपल्या 'ऑन फायर' या पुस्तकात धोनीवर टीका केली होती. 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनी निरूत्साही दिसला होता, असे स्टोक्सने म्हटले आहे.
श्रीशांत टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता. 2011 वर्ल्ड कपपासून तो भारताकडून खेळलेला नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदीतून श्रीशांत 13 सप्टेंबर 2020 ला सुटका होणार आहे. 2005 मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2006 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. 27 कसोटीत त्याने 87 तर 53 एकदिवसीय सामन्यात त्याने 75 विकेट्स घेतल्या आहेत.