मुंबई- केरळमध्ये २७ मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. भुकेने व्याकुळ असलेल्या एका गर्भवती हत्तीणीला काही लोकांनी अननसातून फटाके खायला दिले. हे अननस हत्तीणीने खाल्ले. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली आणि अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट हिने या प्रकरणावर ट्विट करत तीव्र शब्दात राग व्यक्त केला आहे. ही घटना पाहून असे वाटत आहे, की मानव जातीच्या पापांचा घडा भरतो आहे. संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे तिने म्हटले आहे. कुस्तीपटू योगेश्वर दत्त यानेही या घटनेचा निषेध केला आहे. तर मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही. मानवाच्या छळाचे हे आणखी एक उदाहरण आहे. मानव जातीचे अस्तित्व ढासळताना मी पाहत आहे. माणुसकी पुन्हा पराभूत झाली, असे मत कुस्तीपटू बजरंग पुनियाने व्यक्त केले.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, सुरेश रैना फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भुकेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर विराट म्हणाला की, 'केरळमध्ये हत्तीणीबाबत जे काही घडले त्याबद्दल मला दु:ख झाले आहे. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये ममत्व, प्रेम असायला हवे, असे धक्कादायक प्रकार थांबायला हवेत.'
आपण रानटी आहोत. अजूनही आपण काहीच शिकलेलो नाही का? केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत जे घडले ते ऐकून मन हादरून गेले. कोणत्याही प्राण्याला इतकी निर्दयी वागणूक मिळायला नको, असे रोहित शर्माने सांगितले. तर ऋषभ पंत याने केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची जी क्रूरपणे हत्या केली आहे, ती धक्कादायक आहे. एवढे निर्दयी कोण कसे असू शकते. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यायला हवी, असे म्हटले आहे.