मुंबई - इंग्लंडचा संघ पुढच्या वर्षी 2021 मध्ये, जानेवारी ते मार्च महिन्यात भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर हा सामना होणार असून भारताचा हा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना ठरणार आहे. याची माहिती खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. ते कोलकाता येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
गांगुली म्हणाले की, 'पुढच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत इंग्लंडला पाच कसोटी सामने आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता येथे कसोटी सामने आयोजित केले जाऊ शकतात. पण, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही'
दरम्यान, भारताने याआधी एक दिवस-रात्र कसोटी सामने खेळला आहे. २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. कोलकाताच्या इडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशचा डाव आणि ४६ धावांनी पराभव केला होता. त्याचबरोबर भारत आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यावर दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे.