कोलकाता -कोरोनाची लस एकदा आली, की परिस्थिती सामान्य होईल, अशी आशा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सोमवारी व्यक्त केली. कोरोनाचा धोका लक्षात घेता आयसीसीने क्रिकेटमध्ये लाळबंदी केली असून नवे नियमही लागू केले आहेत.
भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालशी बोलताना गांगुली म्हणाला, ''एकदा कोरोनाची लस आली की आयुष्य पूर्वीसारखे होईल. तुम्हाला जरा काळजी घ्यावी लागेल. लाळेचा मुद्दा असल्याने आपल्याला मास्क घालावे लागते. पुढील 2, 3, 4 महिने अवघड जाणार आहेत. आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस सर्व काही ठीक होईल."
चेंडूला लकाकी देण्यासाठी गोलंदाज चेंडूवर लाळ आणि घामाचा वापर करतात. मात्र सद्य परिस्थिती लक्षात घेता लाळेच्या वापरावर मनाई करण्यात आली आहे. कोरोनानंतर, इंग्लंड आणि विंडीज मालिकेतून क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. या मालिकेतही आयसीसीने नवे नियम लागू होतील.
माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रिकेटमध्ये लाळ वापरण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये कोरोना घटनेत एका पर्यायी खेळाडूला खेळण्यास मान्यता दिली आहे. मात्र हा नियम टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये लागू होणार नाही.