कोलंबो- नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खराब प्रदर्शनानंतर, श्रीलंका संघाने घरच्या मैदानावर बांगलादेशच्या संघाला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 'क्लीन स्वीप' दिला. बुधवारी खेळण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 122 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने जिंकली.
या सामन्यापूर्वी श्रीलंकेने मालिकेतील 2 सामने जिंकले होते. त्यानंतर शेवटचा सामनाही 122 धावांनी जिंकत यजमान श्रीलंकेने 'क्लीन स्वीप' देत मालिका जिंकली. कोलंबो येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 50 षटकात 294 धावा केल्या. धावाचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ 172 धावांवरच ढेपाळला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंके पहिला धक्का संघाची धावसंख्या 13 असताना, अविष्का फर्नांडोच्या रुपाने बसला. त्यानंतर कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांना संघाची धावसंख्या 50 पार केली. त्यानंतर संघाची धावसंख्या 96 असताना कर्णधार करुणारत्ने 46 धावा करुन बाद झाला आणि संघाच्या धावसंख्येत 2 धावांची भर पडताच कुशल परेराही 42 धावांवर बाद झाला. कुशल मेंडिस आणि अनुभवी अँजेलो मँथ्युज या दोघांनी शतकी भागिदारी करत मोठी धावसंख्या रचण्यासाठी पायाभरणी केली. दोघांनी अनुक्रमे 54 आणि 87 धावां केल्या. त्यानंतर दासून शनका यांने 14 चेंडूत 30 धावांची झटपट खेळी केल्याने श्रीलंकेचा संघ 294 धावांपर्यंत पोहोचला.
295 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशी फलंदाजांवर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी संपूर्ण डावात वर्चस्व निर्माण केले. दासून शनका 3, कासुन राजिथा 2 आणि लहिरु कुमारा 2, अकिला धनंजया याने 1 गडी बाद केले. सौम्या सरकारने 69 धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेने तीन वर्षानंतर एकाद्या संघाला क्लीन स्पीप दिले आहे. श्रीलंकेने जून 2016 मध्ये आयरलँडला 2-0 ने पराभूत करत मालिका जिंकली होती.