हॅमिल्टन- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मयांक अगरवालबरोबर सलामीला कोण उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. रोहित शर्माने दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली, यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे. त्यांनी मयांकसोबत पृथ्वी शॉ किंवा शुभमन गिल यापैकी एक जण सलामीला येणार हे स्पष्ट केलं आहे.
शास्त्री यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ नव्या चेंडूचा सामना करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर असल्याने मयांकसोबत गिल आणि शॉ यांच्यापैकी एक जण सलामीला येईल.'
दोघेही चांगले खेळाडू आहेत. पण वेलिंग्टन कसोटीत दोघांपैकी कोणाला अंतिम संघात स्थान मिळेल, हे व्यवस्थापनाच्या बैठकीत फायनल होईल. भारतीय संघाचे सदस्य राहिल्याने, दोघांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, असेही शास्त्रींनी म्हटलं आहे.
दरम्यान, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल दोघेही न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात खाताही उघडू शकले नाहीत. सराव सामन्यात भारताची अवस्था ३ बाद ५ अशी झाली होती. तेव्हा हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या गड्यासाठी १९५ धावांची भागीदारी केली. पुजारा ९२ धावांवर बाद झाला. तर विहारीने १०१ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताला पहिल्या डावात २६३ धावांपर्यंत मजल मारता आली.