कराची- धोनीने विनाकारण निवृत्ती लांबवली असून त्याला २०१९ विश्वकरंडकानंतरच निवृत्त व्हायला हवे होते, असे मत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले आहे. तो पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.
अख्तर म्हणाला, 'धोनीने आतापर्यंत त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भारतीय संघासाठी योगदान दिलं आहे. त्याने सन्मानाने निवृत्ती स्वीकारायला पाहिजे होती. तो इतका वेळ कशासाठी थांबला हे मला माहित नाही. मी जर त्याच्या जागी असतो तर कधीच निवृत्त झालो असतो. २०११ विश्वचषकानंतरही मी ३-४ वर्ष सहज मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळू शकत होतो, पण त्या दरम्यान मी तंदुरुस्त नव्हतो. मग अशा परिस्थितीत विनाकारण निवृत्ती लांबवण्यात काही अर्थ नसतो.'
धोनी, विश्वकरंडकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच क्षणी त्याने समजायला हवे होते. पण तो निवृत्तीसाठी इतका वेळ का घेत आहे. याचे कारण तोच सांगू शकतो. त्याने भारतीय संघासाठी दिलेले योगदान पाहता, त्याला योग्य पद्धतीने निरोपाचा सामना मिळणे गरजेचे आहे, असेही अख्तर म्हणाला.