इस्लामाबाद - टीम इंडियाने बांगलादेश विरुध्दची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ खिशात घातली. टीम इंडियाच्या या दमदार प्रदर्शनावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर जाम खुश आहे. त्याने टीम इंडिया टी-२० चा 'बॉस' असल्याचे म्हटले.
नागपुरात बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाच्या प्रदर्शनाची शोएबने स्तुती केली. त्याने सांगितली की, 'टी-२० मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने गमावला. त्यानंतर टीम इंडियाने आपला खेळात सुधारणा करत मालिकेत बरोबरी साधली. निर्णायक सामन्यातही उत्कृष्ट प्रदर्शन करत मालिका जिंकली आणि आम्ही 'बॉस' असल्याचे दाखवून दिले.'
मालिकेत पिछाडीनंतर दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. रोहित सद्यस्थितीत जेव्हा पाहिजे तेव्हा तो धावा बनवू शकतो. हे त्याने सिध्द केले असल्याचेही शोएब म्हणाला.